Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते शिंदे गटावर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे खासदार यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेचा खरपूस समाचार घेत हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनीही पलटवार केला.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हेमंत गोडसे हा चेहरा होता का? असा सवाल करत, शिवसेनेतून गोडसे शिंदे गटात गेले. शिवसेना हाच नाशिकच्या लोकसभेचा चेहरा असणार. तसेच शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही. शिवसेना हाच चेहरा आणि शिवसैनिक हीच आमची ताकद आहे. शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात आणि ते आमच्यासोबत असल्याने आम्हाला चिंता नाही. गोडसे यांनी स्वतःची कबर खोदली असून त्यांनी आता आगामी निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
संजय राऊतांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेतल्या का?
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा हेमंत गोडसे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. शिवसेना हाच चेहरा, गोडसे चेहरा आहे का? तर चेहरा नाही तर काम महत्वाचे असते. संजय राऊत यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेतल्या का? शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटले का? शहरातील उद्योजकांची बैठक घेतली का? उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली का? या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे झाले असून काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपविण्याचे सुरु आहे, या शब्दांत गोडसे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.
हिम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन निवडणूक लढा
संजय राऊत यांनी निवडणुकीचे चॅलेंज दिले. मात्र त्यांना चॅलेंज देतो की, नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवा. हिम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन निवडणूक लढा. मग सगळा सोक्षमोक्ष होईल, असा इशारा देत बाळासाहेबांच्या शिवेसेनेतून जो कोणी उमेदवार असेल त्यांच्यासमोर येऊन लढून दाखवावे. आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखे ते खासदारकी घेतात. महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावण्याचे काम संजय राऊत यांनी केल्याची घणाघाती टीकाही हेमंत गोडसेंनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"