Maharashtra Politics: सिल्लोड येथील सभेवरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेला सिल्लोड नगर परिषदेने परवानगी नाकारली. तर दुसरीकडे त्याचवेळी होणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर आदित्य ठाकरे यांची सभेला परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावरून शिंदे गटाने आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका करत, रणछोडदास मैदान सोडून पळून गेले, असे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील सभा भगवान महावीर चौकात होणार होती. अगदी त्याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा आहे. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या सभा एकाच दिवशी समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली. यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या सभेचे ठिकाण बदलल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सभेला कुणी येणार नाही, म्हणून घाबरून तुम्ही मैदान सोडले
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, रणछोडदास यांनी सिल्लोड सभेचे ठिकाण बदलले. मुख्यमंत्र्याला चॅलेंज देता आणि एका खासदाराला घाबरून सभा रद्द करता. त्यामुळे तुम्ही आपली योग्यता तपासली पाहिजे. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने सर्व शिवसैनिक आहेत. सभेला कुणी येणार नाही, म्हणून घाबरून तुम्ही रणछोडदास झाले आहेत, असा घणाघात म्हस्के यांनी केला.
दरम्यान, दोन्ही नवे चेहरे समोर आले होते. आदित्य ठाकरे आणि दुसरे डॉ. श्रीकांत शिंदे. ठाकरे गटाची सभा कुठे रद्द होतोय की ते रणछोडदास होतात माहिती नाही. पण माझी इच्छा आहे, दोघांच्याही सभा व्हाव्यात. त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी आहे. ज्या ठिकाणी त्यांना कमी पडत असेल तेही करून देतो. पण एखाद्या माणसाला बदनाम करण्यासाठी सभेला परवानगी नाकारली असे म्हणून दुसऱ्याला बदनाम करू नये, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तारांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"