Ramdas Kadam: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नसल्याचे दिसत आहे. विविध मुद्द्यांवरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.
अनिल परब यांच्याविरोधात दापोलीत गुन्हा नोंद झाल्यानंतर रामदास कदम यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोके देतात. पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देत असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले आहे. तसेच पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली होती, असा मोठा दावा रामदास कदम यांनी केला.
अनिल परब यांना अजूनपर्यंत अटक का केली जात नाही?
माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला. अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला. उद्धव ठाकरे यांनाही अशीच माणसे आपल्याभोवती लागतात. सुभाष देसाई हे उद्धव यांचे कान भरतात, या शब्दांत रामदास कदम यांनी घणाघाती टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"