Maharashtra Politics: शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून प्रचंड मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यातच ठाकरे गटातील उरलेले आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी पुन्हा एकदा असाच दावा केला आहे. ठाकरे गटातील अनेक आमदार आमचे मित्र आहेत. काहींशी बोलणी सुरु आहे. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार रात्री अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. हे आमदार आणि खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, ठाकरे गटातील आमदार आमचे मित्र आहेत. आमची त्यांच्यासोबत बोलणे सुरू आहे. लवकरच काही आमदार शिंदे गटात येतील, असे म्हटले आहे.
शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील, असे वाटत नाही
आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते. त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता होती. उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या शब्दाला किंमत होती. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होते. तरीही ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, अशी टीका करत ठाकरे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहिले असे वाटत नाही, असा टोलाही शंभुराज देसाई यांनी लगावला.
दरम्यान, शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. लोकांच्या दारात गेले पाहिजे हे आम्ही त्यांना सांगत होतो. आम्ही तर जातच होतो. पण तुम्हीही जावे, असे आम्ही सांगत होतो. पण त्यांना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हते. आता सत्ता गेल्यावर उसने आवसान आणले जात आहे, अशी घणाघाती टीकाही शंभुराज देसाई यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"