मुंबई : बेळगावी येथे मुक्कामी ६ ते ८ फेब्रुवारी या काळात ९५ वे अ.भा. मराठी नाट्यसमेलन होणार आहे. मुख्य संमेलन स्थळाला बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी असे नाव देण्यात येणार आहे. तर संमेलनस्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य रंगमंचाला स्मिता तळवलकर रंगमंच, लोकमान्य रंगमंचाला सदाशिव अमरापूरकर रंगमंच आणि जिरगे नाट्यगृहातील रंगमंचाला कुलदीप पवार रंगमंच, सुधीर मोघे खुला रंगमंच अशा नावांनी ओळखण्यात येणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार करणार आहेत.६ फेब्रुवारीला स्थानिक कलावंताचे कार्यक्रम होणार आहेत. तर ७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजता नाट्यदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार असून, १० वाजता उद्घाटन होईल. त्याच दिवशी दुपारी नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष फैय्याज यांची प्रकट मुलाखत होणार आहे. एकांकिका महोत्सव, संगीत व नृत्याचे कार्यक्रम, बालनाट्य सादर होतील. सुधीर मोघे खुल्या रंगमंचावर एकपात्री महोत्सव होणार आहे. विच्छा माझी पुरी करा, अवघा रंग एकचि झाला आदी नाटकांचे प्रयोग संमेलनात होणार असून, ८ फेब्रुवारीला संध्याकाळी नाट्यसंमेलनाचा समारोप होईल. दरम्यान, पाहुण्यांची नावे निश्चित झालेली नाहीत. (प्रतिनिधी)
संमेलन स्थळाला बाळासाहेबांंचे नाव
By admin | Published: January 21, 2015 2:11 AM