सोलापूर - आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. त्या नात्याने ते महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकनेते म्हणून ते फिरत नाहीत. ठाकरे आडनाव काढलं तर ५० लोक आदित्यच्या मागे उभे राहणार नाही. अजिबात आमची वाट पाहू नका. आम्ही आजही बाळासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान राखत आहोत. ठाकरी भाषा केवळ बाळासाहेबांना शोभते. ती उद्धव आणि आदित्यला शोभत नाही अशा शब्दात आमदार शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरेसारख्या लहान पोरानं अशा शब्दात टीका करणं योग्य नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले हे आमदार आहेत. मोठ्या माणसांना आदराने बोलायचं हे शिकवलं नाही का? १७-१८ महिन्यांवर आमदारकी निवडणुका येईल. सगळे मैदानात उतरणार आहेत. आम्ही लढताना एकनाथ शिंदेंचा फोटो असेल उद्धव ठाकरेंचा नसेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती जिंकेल असा विश्वास आहे.
तसेच आमचा फॉर्म हा धनुष्यबाणाचा असेल. उद्धव ठाकरेंनी ढाल-तलवार घ्यावी. जी माणसं तळागळात सातत्याने काम करत आहेत ती मजबूत आहे. जी हवेत आहे ते हवेतच जातात. मातोश्रीबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही सारखी टीका करायला लागला तर उलटी उत्तरं आम्हालाही देता येतील. कुठलेही नेतृत्व जनतेसमोर जात असताना नैसर्गिंक गुणांनी जावं. डुप्लिकेट नेतृत्व लोकांना आवडत नाही. तुम्हाला बाळासाहेबांचा वारसा मिळाला आहे. शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्वीकारलं होतं. परंतु तुम्हाला ठाकरी भाषा शोभत नाही. एकवेळ उद्धव ठाकरे बोलले तर आमदारांच्या मनाला लागणार नाही. परंतु आदित्य ठाकरे जे बोलतात ते आमदारांच्या जिव्हारी लागत आहे असं शहाजी पाटलांनी म्हटलं.
संजय राऊत दोषी म्हणून अटकसंजय राऊत दोषी असतील म्हणून त्यांना अटक झाली असावी. ईडीचा कुठलाही दोष नाही. त्यांना अटक केली त्यांचा आर्थिक व्यवहार पुढे येतील. आज महाराष्ट्र किरकिऱ्या कारट्याकडून शांत झाला असेल. उद्धव ठाकरेंनी हा आवाज बंद केला नाही तो ईडीने केला. ७-८ वर्ष त्यांचे दर्शन होत नाही आता निवांत राहा. शांत राहा अशा शब्दात शहाजी पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.