- राहुल शिंदेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठी साहित्य निर्मिती व वाचन संस्कृतीमध्ये घट होत चालल्याने चिंता व्यक्त होत असताना आता राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे बालभारतीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची छपाई तीन वर्षात पन्नास टक्क्याने घटली आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरित केल्या जाणाऱ्या पुस्तकांची संख्या गेल्या वर्षापेक्षा ८ लाख ९९ हजाराने कमी झाली आहे. तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले. अनेक विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. त्यामुळे मागील वर्षी छापलेली हजारो पुस्तके कोरी करकरीत आहेत. परिणामी खुल्या विक्रीसाठी बाजारात मागवल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
गेल्या वर्षी खुल्या विक्रीकरिता २ कोटी ६३ लाख ३१ हजार ५०० पुस्तकांची मागणी होती. त्यानुसार सर्व पुस्तके छापली होती. परंतु, यंदा बालभारतीने खुल्या विक्रीसाठी केवळ ५९ लाख १५ हजार पुस्तकांची छपाई केली आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित करण्याचे काम बालभारतीतर्फे ४ मेपासून सुरू झाले आहे. तसेच ८० टक्के पुस्तकांची छपाई झाली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी १३ जूनला पुस्तके हातात मिळतील.- कृष्णकुमार पाटील,संचालक, बालभारती