औरंगाबाद : सततच्या दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या काळात तब्बल ९५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली आहे. मराठवाडा चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. चार वर्षांत खरीप हंगाम गेलाच, शिवाय दोन वर्षांपासून हिवाळ्यातील गारपिटीमुळे रबी हंगामही वाया गेला. कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळत आहे. दुसरीकडे हाती आलेल्या धान्याला भाव मिळत नसल्याने, आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. २०१०पासून नोव्हेंबर २०१५पर्यंत विभागात २,२८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत १,५२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार १ जानेवारी २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील ५६५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५ कोटी ४४ लाख रुपयांची मदत केली. १९२ आत्महत्या शासनाने मदतीसाठी अपात्र ठरविल्या. १६७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)
मराठवाड्यात बळीराजा पिचला
By admin | Published: November 18, 2015 2:15 AM