ऑनलाइन लोकमत
लासलगाव (नाशिक) : प्रकाशपर्व दिवाळीचा सण सर्वञ उत्साहानं साजरा होत आहे. कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात कष्टकरी, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम गेली 10 वर्षे येथील दत्ताजी पाटील प्रतिष्ठान करत आहे.
खरिप हंगाम संपून रब्बी हंगामाची कामे ग्रामीण भागात सुरू आहे. लासलगाव पंचक्रोशीत खरिपाचा कांदा काढण्याचं काम काही ठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी रब्बीची लागवड सुरू आहे. साहजिकच शेतकरी शेतीच्या कामात आहे. फराळ करायला महिलांना वेळ नसतो, अशावेळी दत्ताजी पाटील प्रतिष्ठानचा माफक दरातील व रुचकर फराळ शेतकरी, हमाल, मापारी, कामगार व कष्टकरी वर्ग घेताना दिसत आहे. साधारणपणे 70 रुपये किलो दरात चिवडा, मसाला शेव, भावनगरी शेव, शंकरपाळे, मका चिवडा,
करंजी, चकली, मोतीपूर लाडू, सोनपापडी असे चवदार पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत.
गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी 60 टन मालाची विक्री अवघ्या एका आठवड्यात झाली होती. यावर्षी चार दिवसांत शनिवारपर्यंत 40 टनाहून अधिक फराळ विक्री झालेली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी दिली. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी, समाधानी आहे. त्यामुळे मागील वर्षीचा विक्रीचा विक्रम यावर्षी मोडेल, अशी स्थिती आहे.
कितीही गर्दी असली तरी योग्य नियोजनामुळे कोणताही गोंधळ येथे होत नाही. या उपक्रमात लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, मालवाहतूक चालक मालक संघटना व सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. बळीराजा, कष्टकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय आहे.