- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - 'काश्मीरमध्ये मारले गेलेले व हिंसाचार करणारे लोक पाकिस्तानच्या दृष्टीने स्वातंत्र्यसैनिक असतील, तर मग हिंदुस्थानात येण्यासाठी लढा देणारे बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धेच आहेत असे आम्ही मानतो. पंतप्रधानांचे यावर काय म्हणणे आहे?', असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे.
'कश्मीरात वातावरण सुधारायचे असेल तर हुरियतवाले व पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी, असे जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना वाटते. हे काही बरोबर नाही. रस्त्यावर उतरणार्यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक नाही व लष्करावर दगड मारणे हे राष्ट्रप्रेम नाही', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे -
- पंतप्रधान मोदी यांचे समर्थन बलुची नेत्यांना भारी पडले आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यवादी नेत्यांवर पाकिस्तान सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे व त्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागेल असे दिसते.
- पाकव्याप्त कश्मीरातील बलुचिस्तान, गिलगीट वगैरे भागातील जनता त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात रस्त्यांवर उतरली आहे. त्यांना पाकिस्तानी अत्याचारापासून मुक्ती हवी आहे. तेथे मानव अधिकाराचे हनन होत आहे व पाकिस्तानने तिकडे लक्ष द्यावे, असे मोदी यांनी सुनावले. मोदी यांच्या वक्तव्याचे बलुची नेत्यांनी स्वागत केले. इंदिरा गांधी यांनी पाक अत्याचारापासून बांगलादेशची मुक्तता केली होती.
- मोदी यांनी बांगलादेशप्रमाणे बलुचिस्तानची मुक्तता करावी असे या नेत्यांनी म्हटले, हे धाडसच समजावे लागेल.
- पाकिस्तानने गिळलेल्या कश्मीरात गेल्या ७० वर्षांत विकासाला पूर्णपणे खीळ बसली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सलोख्याचा खेळखंडोबा चालला आहे. दहशतवादास प्रोत्साहन देणारे ‘कॅम्प’ तेथे चालवले जातात व तेथील बेरोजगार तरुणांच्या हाती शस्त्रे देऊन दहशतवादी बनवणे हाच तेथे रोजगार बनला आहे.
- हिंदुस्थानचे पंतप्रधान यासंदर्भात काय करणार आहेत? बलुची नेत्यांच्या सुटकेसाठी पाकव्याप्त कश्मीरात लष्कर घुसवणार की बलुची नेत्यांवरील दमनचक्रावर आणखी एक भाषण ठोकून धिक्कार करणार? हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले म्हणून बलुची नेत्यांना मोठ्या कारवाईस तोंड द्यावे लागत आहे.
- इथे आमच्या कश्मीरातही रोज उठून पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे व पाकड्यांचे गुणगाण करणारे कमी नाहीत. त्यांच्यावर आपण काय कारवाई केली? कश्मीरात सध्या जे वातावरण चिघळले आहे ते राष्ट्रहिताचे नाही. वातावरण सुधारायचे असेल तर हुरियतवाले व पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी, असे जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना वाटते. हे काही बरोबर नाही. रस्त्यावर उतरणार्यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक नाही व लष्करावर दगड मारणे हे राष्ट्रप्रेम नाही.