राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. २०१९ ला धानोरकर लोकसभेचे तिकीट मिळविण्यासाठी माझ्याकडे आले होते, अशा शब्दांत पवारांनी आठवणींना उजाळा दिला.
धानोरकर माझ्याकडे राष्ट्रवादीकडून खासदारकीचे तिकीट मिळावे यासाठी आले होते. मी त्यांना असे का करताय, तुम्ही काय तयारी केली आहे, असे विचारले होते. तेव्हा धानोरकर यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळेल, तयारीला लागा असे आदेश दिले होते. परंतू, जागा वाटपामध्ये ती जागा भाजपाला गेली. यामुळे मी सर्व तयारी केलेली आहे, मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी ज्याच्याकडे लोकसभेची जागा जाईल तिथून उमेदवारी हवी आहे, असे ते म्हणाले होते, असे अजित पवार म्हणाले.
काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती, परंतू धानोरकर यांनी दुसऱ्या पक्षातून येत विजय मिळविला होता. मी उपमुख्यमंत्री असताना त्यांची आणि त्याच्या आमदार पत्नीने आणलेली सर्व कामे केली. माझ्या चंद्रपुराचा कायापालट व्हायला हवा अशी त्यांची भूमिका होती. नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही, असे पवार म्हणाले.
मी विरोधी पक्षनेते पद स्वीकारले तेव्हा पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा केला होता. तेव्हा ते स्वत: माझ्यासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत होते. राष्ट्रवादीचे चंद्रपुरात कार्यालय नाही हे त्यांनी ऐकले होते. माझे स्वत:चे कार्यालय आहे ते तुम्ही वापरावे, मी पवार साहेबांना मानतो. आपण एकत्र काम करायला हवे, असे ते म्हणाले होते. मित्रपक्षाला आपले कार्यालय देणारा दिलदार नेता. धानोरकर यांच्या जाण्यामुळे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे. मी तिथे फिरताना पहायचो, त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. आंदोलन करायचे तेव्हा आपली भूमिका यश येईपर्यंत रेटण्याच्या त्यांचा प्रयत्न असायचा. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार म्हणाले.
फडणवीसांनीही वाहिली श्रद्धांजली....
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चंद्रपूर जिल्ह्याने जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एक नेता गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.