ओमप्रकाश देवकर,हिवरा आश्रम (बुलडाणा)- डीजे, बँडपथकाच्या कर्कश आवाजावर नाचणारी आजची तरुण पिढी आणि त्यामुळे लग्नसोहळ्यास होणारा विलंब हा त्रास नेहमीचाच झाला आहे. यावर पर्याय म्हणून हिवरा आश्रम आणि परिसरातील मुस्लीम समाजबंधुंनी लग्नात डीजे किंवा बँडबाजाला फाटा देऊन लग्नसमारंभ शांततेत करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी २९ एप्रिल रोजी हिवरा आश्रम येथे पार पडलेल्या लग्न सोहळ्यात प्रत्यक्ष दिसून आली.दुष्काळी परिस्थितीत लग्नसोहळा म्हणजे मुलीच्या पित्याच्या मानेवर धोंडाच. त्यामुळे लग्नसोहळ्यात बँडबाजासारख्या गोष्टींवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हिवरा आश्रम व परिसरातील मुस्लीम समाजबांधवांनी डीजे किंवा बँडबाजा पथकाशिवाय लग्नसमारंभ करण्याचा ठराव केला. येथील वार्ड क्र. ४ मधील कासम शहा यांची कन्या सुलतानाचा विवाह लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील चाँद शहा यांच्या नईम नावाच्या मुलासोबत शुक्रवारी शांततेत पार पडला. या अगोदरही याच वार्डातील इसाक व जाकेराबी यांच्या मुलीचा लग्नसोहळा असाच शांततेत पार पडला. दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळणे महत्वाचे आहे. दुसरे कारण म्हणजे, डिजे व बँडपथकामुळे लग्नसोहळा वेळेवर पार पडत नाही, शिवाय ध्वनिप्रदूषण आणि तरुणांचा जल्लोष यामुळे वऱ्हाडी, गावकरी मंडळीला त्रास होतो. या सर्वच गोष्टींचा विचार करून, हा निर्णय घेण्यात आला आहे.
लग्नसमारंभांतून बँडबाजाला फाटा!
By admin | Published: April 30, 2016 5:11 AM