मुंबई : चायनीज खाद्यपदार्थांमध्ये चव आणण्यासाठी टाकण्यात येणारा अजिनोमोटो प्रत्यक्षात मानवी प्रकृतीसाठी अपायकारक असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे चायनीज रुचकर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या घातक पदार्थावर बंदी आणण्याची एकमुखी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेच्या महासभेत आज केली़ असा ठरावच मंजूर करण्यात आला़ अजिनोमोटोवर बंदी आणण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे सभागृहापुढे आज मांडली़ या सुचनेचे समर्थन करीत सर्वपक्षीय सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला़ रस्त्यावर संध्याकाळी सुरु होणाऱ्या चायनीजच्या गाड्यांनी लोकांना वेड लावले आहे़ मात्र यातील आजाराला आमंत्रण ठरणारे अजिनोमोटोतून मुंबईला मुक्त करा, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली़शाळा, महाविद्यालय, कन्टीन यामध्ये चायनीज पदार्थांना पसंती दिली जाते़ बनावट सॉस, मेलेल्या कोंबड्यांचाही वापर होत असल्याने अशा चायनीजच्या गाड्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही काही सदस्यांनी केली़ तर संध्याकाळी मुंबईच्या रस्त्यांवर लागणाऱ्या चायनीजच्या गाड्यांना वॉर्डांमधूनच अभय मिळते, असा आरोपही काही सदस्यांनी केला़ त्यामुळे अजिनोमोटोला चायनीज पदार्थांमधून हद्दपार करा, असा सूर सर्वपक्षीय सदस्यांनी लावला़ (प्रतिनिधी)
अजिनोमोटोवर बंदी आणा !
By admin | Published: October 21, 2014 3:43 AM