मुंबई : संक्रांतीनिमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे परिसरात वावरणाऱ्या व्यक्ती, तसेच प्राण्यांना इजा होते. परिणामी, या मांजाच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी घालतानाच, अशा मांजाची साठवणूक न करण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. मकर संक्रांतीच्या सणाच्या काळात प्लॅस्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या सर्वसाधारणपणे नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानवाला इजा पोहोचण्याच्या घटना घडल्या आहेत. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना आणि जनजागृतीविषयक कार्यक्रम हाती घेण्यासाठी निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
नायलॉन मांजाचा वापर व साठवणुकीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2017 4:53 AM