मुंबई : येत्या २ आॅगस्टपर्यंत मुंबईवर ड्रोन, पॅराग्लायडिंग किंवा रिमोटने उडणाऱ्या हलक्या विमानांचा उपयोग करून दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीती असल्याने मुंबई पोलिसांनी मुंबईत ड्रोन व रिमोटद्वारे विमान उडवण्यावर बंदी घातली आहे. तसेच मुंबईची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.११ जुलैच्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेला ९ वर्षे पूर्ण होत असतानाच पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना म्हणून दहशतवाद्यांच्या कायम रडारवर असलेल्या मुंबईत ही बंदी लागू केली आहे. शहरात ड्रोन, पॅराग्लायडिंग आणि रिमोटने चालणारी हलकी किंवा खेळण्यातली विमाने उडविण्यास बंदी घातली असून, त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला जाईल, असा आदेश पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (अंमलबजावणी) यांनी काढला आहे.
मुंबईत ड्रोन, रिमोट विमानांवर बंदी
By admin | Published: July 09, 2015 2:38 AM