मुंबई : अधिवेशन कालावधीत विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर सदस्यांनी निदर्शने अथवा घोषणाबाजी केली तरी त्याचे चित्रीकरण, छायाचित्रे समोरच्या पायऱ्यांवर उभे राहून काढायची नाहीत, असा फतवा विधिमंडळाचे सहसचिव म.मु. काज यांनी काढला आहे.मंगळवारी विधिमंडळात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ बसून विरोधकांनी अभिरूप विधानसभा भरवली. त्याचे फूटेज अनेकांनी मोबाइलवरून चित्रित केले, फोटो काढले आणि ते विविध माध्यमांमधून प्रसारित झाले. त्यामुळे आज सहसचिवांनी एक पत्र काढले. त्यात विधिमंडळ सदस्य विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विधान भवनात येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करीत असले तरी, त्याचे चित्रीकरण करता येणार नाही, फोटो काढता येणार नाहीत, सदस्य आक्षेपार्ह, असंसदीय भाषेत घोषणा देत असतील अथवा हातवारे करून बोलत असतील तर त्याचेही चित्रीकरण करता येणार नाही. छायाचित्रकारांना नेमून दिलेल्या जागेवरूनच त्यांना काम करावे लागेल, अशी आठ कलमं त्या पत्रात नमूद केली गेली. विधिमंडळ सचिवांच्या या फतव्यावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि माध्यम प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही तर हुकूमशाही आहे, आम्हीदेखील १५ वर्षे सत्तेत होतो; पण आम्ही माध्यमांवर कधीही अशी बंधने आणली नाहीत, हा माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे, असे वळसे पाटील आणि अजित पवार यांनी सांगितले. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे पत्रकार, फोटोग्राफर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन बागडे यांनी दिले.
विधान भवनात चित्रीकरणास बंदी
By admin | Published: July 16, 2015 2:14 AM