नाशिक : ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यास मनाई करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागे घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर कुंटे यांनीही गमे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिढा सुटला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. तर आपण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित केले होते, असे गमे यांनी माध्यमांना सांगितले. वसुंधरा योजनेअंतर्गत नाशिक विभागाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले असून, त्या अनुषंगानेच राधाकृष्ण गमे यांनी दिवाळी काळात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके विक्री आणि फटाके वाजविण्यास बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले. फटाक्यासारखा हंगामी व्यापार करणाऱ्यांनीही फटाक्यांची अगोदरच खरेदी करून ठेवली असल्याने त्यांची अडचण झाली होती. मंगळवारी फटाके विक्रेत्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नाशिक दौऱ्यात निवेदन दिले होते. अर्थात, गमे यांनी सूचित केले होते, सर्वस्वी निर्णय जिल्हाधिकारी, महापालिका आणि नगरपालिकांनीच घ्यायचा होता. नाशिक महापालिकेने मात्र फटाके बंदी करण्यास नकार दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील फटाक्यांवरील बंदी अखेर मागे; विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:59 AM