सावंतवाडी : आंबोली घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने घाटातील पूर्वाच्या वस भागातील पूल धोकादायक बनले आहे. तसेच घाटातील रस्त्याचे कामही सुरू करण्यात आल्याने आंबोली घाटातून अवजड वाहनांना पुढील आदेश होईपर्यत प्रवेश बंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसा आदेश गुरूवारी रात्री उशिरा सावंतवाडी बांधकाम विभागाच्यावतीने काढण्यात आला आहे. याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनीही दुजोरा दिला आहे.
आंबोली घाटातील पूल कमकुवत बनली आहेत. तसेच काही ठिकाणी पुलांना भेगा गेल्या आहेत. मध्यंतरी याबाबत आंबोलीतील ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. तसेच आंबोली घाटातून अवजड वाहने बंद केली जावीत, अशी मागणी ही लावून धरली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय घेउन तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवला होता.
या प्रस्तावात बांधकाम विभागाने आंबोली घाटावर येणारा ताण कशामुळे याचा उल्लेख केला. यात गोव्यातून बेळगावला जोडणारा चोर्ला घाट तसेच चंदगडला जोडणारा रामघाट या दोन्ही घाटांचे काम सुरू असल्याने बहुतांशी अवजड वाहने ही आंबोली घाटातून जातात. त्यामुळे घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. ही कारणे जोडली असून, यामुळे अवजड वाहनांचा परिणाम हा घाटातील पुले जीर्ण होण्यावर झाला आहे. यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. याचा विचार करून यावर अवजड वाहानांवर बंदी घातली जावी, अशी मागणी केली होती.
यामुळे आता आंबोली घाटातून पुढील आदेश होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी असणार असून, यात २० टनाच्या वरच्या वाहनांना ही बंदी असणार आहे. यातून खडी, वाळू तसेच चिरे वाहून नेणारे डंपर, एसटी बस, एसटीच्या शिवशाही बस याना मुभा दिली आहे. मोठ्या लॉरी तसेच अन्य वाहनांना परवागी नाकारण्यात आली आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी गुरूवारी रात्री पासूनच लागू करण्यात आली आहे. याबाबत बांधकाम विभागाने पोलिसांनाही माहीती दिली आहे.
याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियता युवराज देसाई यांनी सांगितले कि, आम्ही जिल्हा प्रशासनाकडे अवजड वाहानांना बंदी बाबत प्रस्ताव पाठवला होता. जिल्हा प्रशासनाने सभाव्य धोका लक्षात घेउन यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे ही अंमलबजावणी केली जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.