मुंबई - कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या किटनाशकांची पुढील दोन महिन्यांसाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिली.
अमरावती जिल्ह्यात नमूद कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ही कीटकनाशके अति विषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस 40 टक्के अधिक सीपरमेथ्रीन 40 टक्के ईसी, फिप्रोनील 40 टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड 40 टक्के डब्युजी, ऍसिफेट 75 टक्के एससी, डीफेन्थीरोन 50 टक्के डब्लुपी, मोनोक्रोटोफॉस 36 टक्के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनेची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.
धोकादायक कीटकनाशकांची विक्री, वितरण व वापर यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजूर यांवर उपचार सुरू असल्याचेही कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.