- राजरत्न सिरसाट / ऑनलाइन लोकमत
संशोधित बियाणे नसल्याने क्षेत्रावर मर्यादा
अकोला, दि. 27 - गतवर्षी लाखोळी डाळ विक्री व पेरणीवरील बंदी उठविण्यात आली आहे; परंतु दहा वर्षांआतील संशोधित बियाणेच उपलब्ध नसल्याने यावर्षी लाखोळी डाळ लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही.
देशांतर्गत डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी असून, मानवाला लागणारी पूरक प्रथिने तूर डाळीसह इतर डाळींमध्ये असल्याने देशातील लोकसंख्येची गरज बघून, डाळींची आयात केली जात आहे. डाळींची गरज भागविण्यासाठी या पिकांचे देशांतर्गत क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यात एकेकाळी उत्पादन व खाण्यावर बंदी घातलेल्या लाखोळी डाळीचा उपयोग वाढविण्यावर आता भर देण्यात येत आहे.
लाखोळी डाळीचे राज्यात ७५ हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र आहे. विदर्भात यातील ३० ते ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात आजही पारंपरिक लाखाची डाळ धान काढण्याच्या पंधरा दिवस अगोेदर शेतात फेकून दिली जाते. याच फेकलेल्या डाळीचे उत्पादन धान उत्पादक शेतकरी घेत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागातर्फे शेतकºयांना मात्र नवे संशोधित, कमी विषाक्त असलेले वाण पेरणीसाठी वापरण्याची शिफारस केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु शेतकºयांना संशोधित वाण मिळत नसल्याने शेतकरी आजही पारंपरिक लाखोळी डाळीचाच पेरणीसाठी वापर करीत आहेत.
- धोका कायम
लाखोळी डाळीमुळे अर्धांगवायूचा धोका असल्याने गेली तीन दशके या डाळीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तथापि गतवर्षी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या डाळीवरील बंदी उठवली आहे, असे असले तरी काही कृषिशास्त्रज्ञ मात्र अद्यापही या डाळीमुळे अर्धांगवायूचा धोका असल्याचा इशारा देत आहेत; पण एका दशकापासून लाखोळी डाळीवरील बंदी उठविण्यासाठी लढा देणारे डॉ. शांतीलाल कोठारी हे ही डाळ खाण्यासाठी निर्धोक असल्याचे ठामपणे सांगत आहेत.
- नवीन वाण विकसित पण बियाणे नाही!
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुसा येथील डाळवर्गीय संशोधन संस्थेने व छत्तीसगड कृषी विद्यापीठाने नवे संशोधन करू न कमी विषाक्त (न्यूरोटॉक्सिकअॅसिड) असलेल्या लाखोळीच्या डाळीचे वाण विकसित केले आहे; परंतु पेरणीसाठी दहा वर्षाआतील संशोधित बियाणेच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
- विदर्भात तीन लाखांवर असलेले लाखोळी डाळीचे क्षेत्र बंदी घातल्यानंतर कमी झाले. तीन दशके विक्री व खाण्यावर प्रतिबंध होता. पण, गतवर्षी विक्रीवरील बंदी उठवण्यात आली आहे. आता या डाळीचे क्षेत्र वाढेल.
- डॉ. के.बी. वंजारी, ज्येष्ठ कडधान्य डाळवर्गीय संशोधक, नागपूर.