पुणे : वर्ग भरलेला आहे... विद्यार्थी वह्या पुस्तकांचा जामानिमा करतायेत... खिशातून हळूच पुडी काढून हातावर चोळून तोंड बार भरत मुलांना धडा शिकावयास सुरूवात केली...असे तंबाखू, जर्दा भरणाऱ्या शिक्षकांचे चित्र शाळांशाळांतून दिसायचे. मात्र विद्यार्थ्यांपुढे आदर्श असणाऱ्या शिक्षकांनो यापुढे सावधान! अध्यापन करताना तंबाखू किंवा इतर व्यसन करून शिकवणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षक संचालनालयाने काढले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवत असताना तंबाखू, खर्रा, पान, जर्दा चघळणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षकांना अगदी व्यसन नसले तरी तल्लफ झाल्यानंतर तंबाखू चोळणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. मुळात शालेय परिसर व्यसनमुक्त असावे, तंबाखूमुक्त असावे यासाठी शिक्षण विभागाने अध्यादेश काढून शालेय परिसरात तंबाखू, गुटखा बंदी करण्याचा आदेश ही यापूर्वी दिला आहे. तसेच याबाबतचा फलक लावण्यासही सुचिवले होते. तरीही सर्रासपणे विक्री होतेच. परिणामी शिक्षक व त्यामुळे विद्यार्थी ही या व्यसनांकडे आकर्षित होतात. ही गोष्ट लक्षात घेऊन पान, तंबाखू, सिगारेट, विडी असे कोणतेही व्यसन करत किंवा केलेल्या अवस्थेत शिकवणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करून तसा अहवाल देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. ‘ओरिएन्टल ह्यूमन राइटस प्रोटेक्शन फोरम’ने केलेल्या पाहणीत राज्यातील काही शाळांमधील शिक्षक विडी, सिगारेट, जर्दा, खर्रा, तंबाखू, पान खाऊन शिकवत असल्याचे आढळले. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. व्यसने विद्यार्थ्यांसमोर केल्याने विद्याथीर्ही हळूहळू व्यसनांच्या अधीन होतात. परिणामी शिक्षकांना व्यसनापासून परावृत्त करा. जे शिक्षक सांगूनही ऐकत नसतील त्यांच्यावर कारवाई करा, असे फोरमने निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांवर बंदी
By admin | Published: January 09, 2016 1:33 AM