औरंगाबाद : महापालिका आणि नगरसेवकांच्या परवानगीने आरोग्य कॅम्प लावल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांना कथित आयुर्वेदिक औषधे देऊन फसवणूक करणाऱ्या तब्बल २० बोगस डॉक्टरांच्या टोळीला सोमवारी सकाळी एमआयडीसी चिकलठाणा परिसरात जेरबंद करण्यात आले. चिकलठाणा भागात याच टोळीतील आणखी काही जणांनी हा गोरखधंदा सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.नगरसेवक राजू शिंदे यांच्या चिकलठाणा एमआयडीसी वॉर्डात सोमवारी सकाळी किमान २० डॉक्टरांचे पथक दाखल झाले. त्यांनी शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाजूलाच आपले ‘दुकान’ लावले. पथकातील महिला सदस्य अॅप्रन घालून वॉर्डातील प्रत्येक घरात जात होत्या. मनपाने कॅम्प लावला असून, ५ ते ८० वयोगटातील रुग्णांना व्हिटॅमिन ^‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’युक्त औषधे देण्यात येत आहेत. नोंदणी फी ५० रुपये आणि औषध घेतल्यावर आणखी ५० रुपये घेण्यात येत होते.वृद्धांना सांधेदुखी, महिलांना केस गळणे, चिडचिडेपणा विशिष्ट औषधांनी दूर होतो आदी अनेक दावे या पथकातील महिलांकडून करण्यात आले. पण देताना घरातील प्रत्येक सदस्याला एकसारख्याच गोळ्या व औषधे देण्यात येत होती. नोंदणी फीमध्ये सूट मिळावी म्हणून एका महिलेने नगरसेवक राजू शिंदे यांना फोन केला. तेव्हा, आपल्या वॉर्डात मनपाने आरोग्य शिबिर लावले का? अशी विचारणा त्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याकडे केली. त्यांनी नकार देताच शिंदे वॉर्डात पोहोचले.बोगस डॉक्टरांच्या सदस्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रथम मनपाकडून हा कॅम्प असल्याचे सांगितले. नगरसेवकाचीही परवानगी घेतल्याचे नमूद केले. मी कोण आहे, अशी विचारणा केल्यावर आम्हाला काय माहीत, अशी उत्तरे त्या महिलांनी दिली. तुमचे शिक्षण काय, असे शिंदे यांनी विचारले असता सर्वांनी, ‘बारावी उत्तीर्ण’ असे सांगितले.सामाजिक संस्थेचा उपक्रम?दीपक निकाळजे या स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने आमची सामाजिक संस्था काम करीत असून, त्याअंतर्गत हा उपक्रम सुरू असल्याचे बोगस डॉक्टरांनी सांगितले. रविवारी आंबेडकरनगर येथे आम्ही काम केल्याचे त्यांनी नमूद केले. चिकलठाणा भागातही आमच्या संस्थेचे काही सदस्य काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)...आणि त्यांनी ठोकली धूमआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी व इतर डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस येण्यापूर्वीच पथकातील आठ ते दहा महिलांनी अॅप्रन तिथेच टाकून धूम ठोकली. पाच ते सहा महिला पोलिसांच्या हाती लागल्या.
बोगस डॉक्टरांची टोळी जेरबंद
By admin | Published: March 28, 2017 4:13 AM