लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे नवी मुंबईमधील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी व समाजसेवकांनी सोशल मीडियावरून जोरदार समर्थन केले होते; परंतु प्रत्यक्षात शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याने शेतकरी प्रेम बेगडी ठरले आहे. मुंबई बाजार समितीमधील कर्मचारी व माथाडींनी दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांना अटक होताच मार्केट बंदसाठी सक्ती सुरू केली होती; पण सोमवारी बंदचे आवाहन करूनही सर्व व्यवहार सुरळीत असल्याने त्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. माथाडीनेते शशिकांत शिंदे यांना २ जूनला कोरेगावमध्ये आंदोलन केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या समर्थकांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांची इच्छा नसतानाही बळजबरीने मार्केट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये बाजार समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता; परंतु ५ जूनला राज्यभर बंदचे आवाहन केले असताना मुंबई बाजार समितीमधील माथाडी कामगार व बाजार समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनीही बंदचे आवाहन केले नाही. माथाडी नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनीही बंदसाठी आग्रह धरला नाही. नरेंद्र पाटील यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. शेतकरी संघटना बाजार समितीमधील माथाडी कामगारांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहात असतात. आमच्याविरोधात सातत्याने भूमिका घेत असताना आम्ही का पाठिंबा द्यायचा? असा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. बाजार समितीसह नवी मुंबईमधील सर्वच बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. वॉट्स अॅप व फेसबुकवरून बंदला पाठिंबा जाहीर करणाऱ्या नेत्यांपैकी प्रत्यक्षात बंदमध्ये कोणीही सहभागी झाले नाहीत. एकही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बंदसाठी प्रयत्न केले नसल्याने बंद पूर्णपणे फसला आहे.
बंदला पाठिंबा फक्त सोशल मीडियावर
By admin | Published: June 06, 2017 2:25 AM