मुंबई, दि. 28 - मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील महिलांची छेड काढणा-या रोडरोमियोच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जिब्रान सय्यद असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियोचं नाव असून गेल्या महिन्याभरात त्यानं जवळपास 40 हून अधिक महिलांची छेड काढल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुरुवारी ( 27 जुलै ) जिब्रानला खारदांड्याहून अटक करण्यात आली आहे.
पाली हिल, माउंट मेरी, बँड स्टँड या ठिकाणांची मुंबईतील उच्चभ्रू वस्तींमध्ये गणती केली जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून 28 वर्षांच्या जिब्रान सय्यदची या परिसरातील महिला-तरुणींमध्ये एवढी दहशत पसरली आहे की त्यांनी मॉर्निंग वॉकला जाणेही बंद केले आहे. गेल्या एका महिन्यात 28 वर्षांच्या जिब्रान सय्यदनं जवळपास 40 हून अधिक तरुणींची छेड काढली आहे. या परिसरांमध्ये त्याची दहशत एवढी वाढली की काही कुटुंबीयांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर यांच्यासोबत संपर्क साधून तक्रार नोंदवली.
याची गांभीर्यानं दखल घेत वांद्रे क्राईम ब्रांचनं याप्रकरणी चौकशी करायला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई व पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकानं घटनास्थळावरील महिनाभराच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये असे आढळले की, जिब्रानच्या बाईकचा रंग चॉकलेटी आहे व त्यावर नंबर प्लेटच लावलेली नाही. याबाबत आरटीओच्या मदतीनं जवळपास अडीच हजार 4 जी बाईक्सचा तपशील मागवण्यात आला. अडीच हजार बाईक्सपैकी 900 चॉकलेटी रंगाच्या 4 जी अॅक्टिव्हा मोटार बाईक्स वापरणा-यांचे घरांचे पत्ते व मोबाइल क्रमांक मिळवण्यात आले.
वांद्रे क्राईम ब्रांचकडून तपास सुरू असताना जिब्रानला सय्यद गुरुवारी वांद्रे येथील कार्टर रोडवर आढळून आला. वेळ वाया न घालवता पोलीस कार्टर रोडच्या दिशेने रवाना झाले. तेथे त्यांना चॉकलेटी रंगाच्या बाईकवर आरोपी दिसला मात्र पोलीस अधिकार तेथे पोहोचणार तोच आरोपी जिब्राननं तेथून पळ काढला होता. यानंतर अखेर पोलिसांनी त्याच्या खारदांड्याला मुसक्या आवळल्याच. यावेळी त्याच्याजवळील बाईकवर नोंदणीकृत क्रमांक नसल्याचंही आढळले. गेल्या काही दिवसांपासून जिब्रान सय्यदमुळे या परिसरातील महिला-तरुणी त्रस्त झाल्या होत्या. त्याच्या दहशतीमुळे येथील तरुणींनी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणंही बंद केले होते. मात्र अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.