वांद्रे वरळी सी लिंक दिल्ली-मुंबई महामार्गाला जोडण्याची योजना असल्याची मोठी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी ५० हजार कोटी रूपयांचा उड्डाणपूल समुद्रात उभारण्याची योजना असल्याचं गडकरी म्हणाले.
"वांद्रे वरळी सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामं केली. त्या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे अनेक जण होते. मला वांद्रे वरळी सी लिंक हा वसई विरारच्या पलिकडे नेऊन मुंबई दिल्ली महामार्गाला जोडायचा होता. ती एक गोष्ट राहून गेली. सध्या दिल्ली मुंबई महामार्गाची उभारणी केली जात असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. १ लाख कोटींचा हा प्रकल्प अशून त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. तोच महामार्ग वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न असून त्यासाठी समुद्रात ५० हजार कोची रूपयांचा खर्चं येणार आहे," अशी माहिती गडकरी यांनी दिली.
राज्य सरकारशी चर्चा करणार"या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली जाणार असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच या उड्डाणपूलाची उभारणी केली जाईल. सध्या त्यावर अभ्यास सुरू असून हा पूल असता तर आज वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची गर्दी झाली नसती," असं त्यांनी नमूद केलं. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर वक्तव्य केलं. वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्प करून रस्ता वाढवला जाईल. कारण ही मुंबईची लाइफलाइन असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मुंबईत विकासासाठी जागा नाही"महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. पायाभूत सुविधांचा विचार करूनच मुंबईचा विकास केला गेला पाहिजे. मुंबईच्या बाजूला समुद्र असल्यामुळे आता जागाच शिल्लक राहिली नाही. नवी मुंबईतही गर्दी धाली आहे. महाराष्ट्रात मुंबईतील उद्योग व्यवसायांचं विकेंद्रीकरण झाल्यास राज्याचा विकास होईल. पुढील २५ वर्षांचा विचार करून सल्ला मसलतीनंतर राज्य सरकारनं डॉक्युमेंट तयार करावं," असं गडकरी म्हणाले.