प्रसाद आर्वीकर, परभणीमहाराष्ट्राला थोर साधू-संतांची परंपरा आहे़ संत ज्ञानेश्वरांपासून ते अलीकडे संत गाडगेबाबापर्यंतच्या अनेक संतांनी या भूमीत जन्म घेऊन समाजाला सतत जागृत ठेवून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग दाखविला़ हीच परंपरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सदासर्वकाळ अखंडपणे सुरू आहे़ मराठवाड्याला संतांची भूमी म्हटले जाते़ दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूर येथील विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पायी जातात़ धर्म आणि तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक असलेले संत ब्ऱ रंगनाथ महाराज परभणीकर यांचा जिल्ह्यात आणि राज्यात मोठा शिष्य परिवार असून, रंगनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने परभणी नगरी पावन झाली आहे़ परभणी जिल्ह्याला संतांची नगरी म्हणून ओळखले जाते़ श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांचा जन्म सोनपेठ येथे १८८९ मध्ये झाला़ त्यांच्या आईचे नाव मनुबाई तर आडनाव चिद्रवार असे होते़ बालपणीच आई, वडिलांचे छत्र हरवले़ प़पू़ रंगनाथ गुरुजींना लहान वयापासूनच देवधर्माची आवड असल्याने ते कथा, कीर्तन व प्रवचनासाठी मंदिरात जात़ त्यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाऊ यांनी गुरुजींना आई, वडिलांची उणीव भासू दिली नाही़ ज्येष्ठ बंधूचा कपाशीचा व्यापार सांभाळत ते परमार्थही करू लागले़ परंतु, दुर्देवाने व्यापारात आर्थिक नुकसान सोसावे लागले़ तेव्हापासून त्यांनी कधीही हातात तराजू न घेण्याचे ठरविले़ रंगनाथ गुरुजी ब्रह्मचारी होते़ त्यांनी शिष्य निर्माण केले़ परंतु, स्वत:ची परंपरा निर्माण केली नाही़ त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोक कीर्तन, प्रवचन करतात़ रंगनाथ गुरुजींनी कधीही शिष्यास आसक्ती निर्माण केली नाही ते खरेखुरे मोक्षदानी गुरू होते़ सत्पुरुषाची जोड ही मोक्ष मार्गाला लावण्यासाठी असते़ लौकिक, व्यवहार जोडण्यासाठी नव्हे, ही पूर्ण समज त्यांनी शिष्यांना दिली़ जो मोक्ष देतो तोच सद्गुरु होय या अर्थाने गुरुजी हे खरेखुरे सद्गुरु होते़ सिद्ध पुरुष योगानंद यांचे शिष्य गंगाराम यांच्याकडून गुरुजींनी परमार्थातील प्राथमिक शिक्षण घेतले़ श्रेष्ठ हरिभक्त व निष्ठावंत वारकरी निवृत्ती बुवा यांच्या हातून गुरुजींनी तुलसीमाला धारण केली व वारकरी सांप्रदायात प्रवेश केला़ प़प़ श्री शंकरानंद सरस्वती स्वामी यांच्याकडे रंगनाथ महाराजांनी विचारसागर व वृत्ती प्रभाकर या गुढ व आघाध तत्वज्ञान दर्शक ग्रंथाचा अभ्यास केला व त्यांच्याच आज्ञेवरून ते आळंदीत साखरे महाराजांच्या साधकाश्रमात आले़ येथून पुढे प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून राज्यभर संत धर्माचे जनजागरण व ज्ञानप्रबोधन त्यांनी केले़ अढळ गुरुनिष्ठा, वेदांतावरील निष्ठा व वारकरी सांप्रदायावरील त्यांची निष्ठा उच्चकोटीची होती़ संसारी लोकांना परमार्थी बनविण्याचे महान कार्य त्यांनी केले़ त्यामुळेच रंगनाथ महाराज हे धर्म व तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक ठरतात.
बांगरवाडीचा स्वयंभू गुप्त विठोबा
By admin | Published: July 08, 2014 11:31 PM