नवी मुंबई : शहरात बांगलादेशीय नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. भारताच्या सीमाभागातून घुसखोरी करून आलेल्या बांगलादेशीयांनी विविध शहरात बेकायदेशीर वास्तव्य केले आहे. सायबर सिटीतही गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशीयांचे बेकायदा वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणे पोलिसांनी तीस नागरिकांना ताब्यात घेतले आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या नवी मुंबई शहराला भिकाऱ्यांचा वेढा पडला आहे. त्याचबरोबर बेकायदा बांगलादेशीय नागरिकांचे वास्तव्य सुध्दा वाढले आहे. विशेषत: गाव-गावठाणातून उभारलेल्या चाळी, फिफ्टी-फिफ्टीच्या इमारती तसेच झोपडपट्ट्यांतून बांगलादेशीय नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांवरही या नागरिकांचा डेरा दिसून येतो. कामोठे, खारघर, उलवे, नवीन पनवेल तसेच नैना क्षेत्रातील नव्याने उभारल्या जात असलेल्या बांधकाम प्रकल्पांवर मजूर म्हणून काम करणाऱ्यांत या बांगलादेशीय नागरिकांची संख्या मोठी आहे, तर काही बांगलादेशीय महिला घरकाम करतात. कोपरखैरणे परिसरात अशा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. कोपरखैरणे गावातील खाडी किनाऱ्यावर वसलेल्या झोपड्यांतून अनेक बांगलादेशीय नागरिक राहत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी धाड टाकून तीस नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. दोन वर्षांपूर्वी खारघर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका बांधकाम प्रकल्पांवर धाड टाकून अनेक बांगलादेशींची धरपकड केली होती. (प्रतिनिधी)>बांगलादेशींकडे रहिवासी पुरावेदेशात घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशीय नागरिकांकडे शिधापत्रिका, पॅन कार्ड तसेच आधार कार्ड असल्याचे आढळून आल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
शहरात बांगलादेशींचे बेकायदा वास्तव्य
By admin | Published: January 20, 2017 2:52 AM