- शाम धुमाळ कसारा : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात रेतीउपसा सुरू आहे. ही उपसा करण्यासाठी बांगलादेशी कामगार याठिकाणी काम करत आहेत. धरणांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पालिकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करूनही येथे बांगलादेशींनी घुसखोरी केल्यामुळे धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भातसा, तानसा, वैतरणा धरणांपैकी सध्या वैतरणा धरणातून बोटी व सक्शन पंपाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात रेतीउपसा सुरू आहे. रेती काढण्यासाठी तब्बल ५० हून अधिक बांगलादेशी कामगार येथे काम करत आहेत. धरणातच बोटी उतरवून रेती काढली जाते. डिझेलवर या बोटी चालवल्या जात असल्याने धरणातील पाण्यावर तेलाचा तवंग पसरून पाणी दूषित होऊन मासे मृत्यूमुखी पडत आहेत. बेकायदासुरू असलेल्या या रेती उपशामुळे धरणाच्या पातळीत घट होत आहे.
रोज शेकडो ब्रास रेती उत्खनन करून विकासकांना चढ्या भावात विक्री केली जात आहे. सरकारचा लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या रेतीमाफियांवर कारवाईसाठी महसूल विभागाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु जंगल व अंधाराचा फायदा घेत हे माफिया पळून जातात. या दरम्यान या रेती चोरांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पालिका, महसूल, वनविभाग व पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून होत असून बांगलादेशी कामगारांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहेत.
हमारा सेठ पैसा देता है...
दरम्यान, रेती उपसा करून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास हटकले असता ‘हमारा सेठ सब को पैसा देता हेै’ असे उत्तर दिले व रेतीने भरलेली गाडी जोरात नेली. रेती उपसा करून वनविभागाच्या जागेतून वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियांना वनविभाग अभय देत असल्याने रेती माफियांची हिंमत वाढली आहे. डोळ्यासमोर रेतीउपसा होत असताना मुंबई पालिकेचे अधिकारी, कर्मचारी झोपेचे सोंग घेत आहेत.
वैतरणा धरणाच्या जंगलात रेतीच्या गाड्या व बोटी पकडण्यासाठी आम्ही लवकरच ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेऊन कारवाई करणार आहोत. या अगोदर अनेकवेळा रेतीच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वैतरणा धरणातील रेतीउपसा करणाºयाविरोधात टेम्भे ग्रामपंचायतीला येथे विशेष ग्रामसभा घेऊन वाळू माफियांविरोधात जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर