नाशिक : सायकल चळवळ नाशिकची ओळख व्हावी. देशपातळीवर सायकलिंगसाठी नाशिकचे उदाहरण दिले जावे, या उद्देशाने शहरातील सर्व वयोगटातील सायकलपटू एकत्र येऊन बांग्लादेशाच्या नावावर असलेला जागतिक ‘लॉँगेस्ट सिंगल लाइन आॅफ बायसिकल’चा विक्रम मोडित काढणार आहे. सुमारे दहा कि.मी पर्यंत दोन हजार पटूंची जगातील सर्वात लांबलचक रांग नाशिकमध्ये पहावयास मिळणार आहे.सायकल चळवळीला बळ देण्यासाठी व नवीन सायकलपटू घडविण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. या संस्थेचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांच्या निधनामुळे सायकलपटूंवर दुखाचा डोंगर कोसळला; मात्र त्यांनी या चळवळीसाठी घेतलेल्या परिश्रमातून प्रेरणा घेत सर्व सायकलिस्ट दुखातून सावरत जिद्दीने चळवळ पुढे नेण्यासाठी खंबीर झाले आहेत.
येत्या ४ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये सुमारे दोन हजार सायकलपटू एकत्र येऊन एका सरळ रांगेत दहा कि.मी. पर्यंत सायकल चालविणार आहे. यापुर्वी बांग्लादेशमधील ढाका शहरातील ‘बी.डी. सायकल्स’ या संस्थेच्या नावावर असा जागतिक पातळीवरील विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदविलेला आहे. यावेळी सुमारे एक हजार दोनशे सायकलपटूंची तीन कि.मी.ची रांग होती. सदर विक्रम मोडीत काढण्यासाठी किमान दोन हजार सायकलपटूंची जगातील सर्वात मोठी एकच रांग तयार करण्याचा निश्चय नाशिक सायकलिस्टने केला असल्याची माहिती नाशिक सायकलिस्टचे नुतन अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.