मुंबई : सिटी बँकेच्या खातेदाराच्या क्रेडिट कार्डवरून ७६,१२४ रुपयांचा अनधिकृत व्यवहार होऊनही, त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार न नोंदविता उलट खातेदारालाच त्याचा भुर्दंड भरायला लावणाऱ्या सिटी बँकेला अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला. संबंधित खातेदाराच्या खात्यावर ७६,१२४ रुपये जमा करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५,००० रुपये देण्याचेही आदेश दिले.
बँकेकडे आपले क्रेडिट कार्ड खाते, बचत खाते, मुदत ठेव खाते वगैरे सुरक्षित असल्याची भावना ग्राहकांच्या मनात असते, परंतु ज्यावेळी खात्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतो व खात्यावर अनधिकृत व्यवहार होतात. त्यावेळी बँकेने अशा अनधिकृत व्यवहाराची पुनरावृत्ती होऊ नये व ग्राहकांचा बँकेवर विश्वास राहावा, यासाठी बँकेने ठोस कारवाई करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदविले.चेंबूर येथील रहिवासी उल्हास चेंबूरकर यांनी ग्राहक मंचात केलेल्या तक्रारीनुसार, चेंबूरकर यांच्याकडे सिटी बँकेची दोन क्रेडिट कार्ड आहेत. या कार्डांचा आॅक्टोबर २०१७ मध्ये तपशील मिळताच चेंबूरकर यांच्या लक्षात आले की, त्यांच्या कार्डवरून ७६,१२४ रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला आहे. त्यांनी याबाबत बँकेला माहिती दिली. बँकेच्या एका प्रतिनिधीने त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करायला सांगितली.
‘याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली. त्यानंतर, बँकेने माझ्या खात्यावर ७६,१२४ रुपये जमा केले. मात्र, माझा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बदलल्याचे लक्षात येताच, बँकेने ही रक्कम पुन्हा माझ्या खात्यातून उचलली. हा अनधिकृत व्यवहार बँकेने अज्ञात व्यक्तीच्या संगनमताने केला,’ असा आरोप चेंबूरकर यांनी केला आहे.त्यावर बँकेने ग्राहक मंचाला सांगितले की, तक्रारदार यांच्या क्रेडिट खात्यावरील व्यवहार आॅनलाइन पद्धतीने होत असतात. व्यवहार करताना क्रेडिटधारकास आपला गोपनीय सांकेतिक क्रमांक वापरल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. तक्रारदार यांच्या क्रेडिट खात्यासंबंधीचा गोपनीय सांकेतिक क्रमांक तक्रारदार यांच्याशिवाय इतर कोणीही त्याचा वापर करू शकत नाही. सांकेतिक क्रमांक वापरूनच तक्रारदाराने मोबाइक क्रमांक व ईमेल आयडी बदलला आहे. त्यामुळे तक्रारदाराने ७६,१२४ रुपये भरणे आवश्यक आहे. मात्र, ग्राहक मंचाने बँकेचा युक्तिवाद फेटाळला.
ग्राहकाच्या खात्यात ७६ हजार जमा करण्याचा आदेशखात्यावर अनधिकृत व्यवहार करणाºया अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याकरिता पोलीस स्टेशन, सायबर गुन्हे शाखेकडे बँकेने पुढाकार घेऊन तक्रार करायला हवी होती. किमान क्रेडिट कार्ड खात्यावरून इझ माय ट्रिप, मेक माय ट्रिप, पेटीएम या व्यापारी आस्थापनांना दिलेल्या रकमेसंबंधी व्यवहाराच्या नोंदीनुसार त्या आस्थापनांच्या संबंधित बँकेकडून माहिती घेऊन या व्यापारी आस्थापनांकडे झालेल्या अनधिकृत व्यवहाराची चौकशी करायला हवी होती, परंतु अशी कोणतीही कार्यवाही बँकेने केल्याचे दिसून येत नाही. याचा अर्थ बँकेची ग्राहकांच्या प्रती आस्था, ग्राहकांच्या खात्याची सुरक्षितता व पर्यायाने ग्राहकांचे संरक्षण याकडे दुर्लक्ष केले आहे, असे मत ग्राहक मंचाने नोंदवत, बँकेला तक्रारदाराच्या खात्यावर ७६,१२४ रुपये जमा करण्याचे आदेश दिले, तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी ५,००० रुपये देण्याचाही आदेश दिला.