ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 25 - राज्यस्तरीय अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनात कॅशलेस व्यवहाराबाबत जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया व इतर बँकर्स शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८ व्या जयंती तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जन्मदिवसाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.अॅग्रोटेक २०१६ हे कृषी प्रदर्शन उत्तम शेतीची संकल्पना रुजविणारे ठरणार असल्याचा विश्वास कृषी विद्यापीठाला आहे. यासोबतच विद्यापीठाने विकसित केलेले कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान व कृषीपूरक प्रक्रिया उद्योग व व्यवसाय इत्यादींची माहिती येथे शेतकऱ्यांना देण्यात येईल. हे वर्ष जागतिक मृदा वर्ष म्हणून साजरे करण्यात आले या पृष्ठभूमीवर शेतीचा श्वास व प्राण असलेली जमीन व पाणी वापर शेतकऱ्यांनी कसा करावा यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.यंदाच्या कृषी प्रदर्शनामध्ये ४०० स्टॉल लावण्यात आले आहेत.कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विद्यापीठाच्या दालनासोबतच शासनाच्या विविध विभागांचे माहितीयुक्त दालने, कृषी निविष्टा उत्पादक कंपन्यांची दालने, कृषी यंत्रे व अवजारे उत्पादक कंपन्यांची दालने तसेच स्वयं सहाय्यता बचत गटांची दालने, पशू प्रदर्शन इत्यादींची माहिती येथे शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ देतील.- शेतकऱ्यांना देणार कॅशलेस व्यवहाराची माहिती कृषी प्रदर्शनात पात ते सात लाख शेतकरी भेट देणार असल्याने त्यांना कॅशलेस संकल्पना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली जाणार आहे. याकरिता जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया आदी बँकर्स शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यंदाच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पाच ते सात शेतकरी व नागरिक भेट देणार आहेत. त्या दृष्टीने कृषी विद्यापीठाने नियोजन केले असून, शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार सोप्या करता यावा यासाठी बँका मार्गदर्शन करणार आहेत. - डॉ. किशोर बिडवे,जनसंपर्क अधिकारी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
अकोल्यात बँका कॅशलेस व्यवहारावर करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन !
By admin | Published: December 25, 2016 9:11 PM