मुंबई : देशातील बँक कर्मचारी व अधिका-यांच्या दहाव्या द्विपक्षी कराराच्या मागणीसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान संपाची हाक दिली आहे. त्यामुळे चार दिवस संप आणि १ मार्चला असलेल्या रविवारमुळे सलग पाच दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत.याआधी बँक कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारी रोजी एक दिवसीय संप पुकारला होता. तर इंडियन बँक असोसिएशनसोबत झालेल्या चर्चेनंतर २१ ते २४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या चार दिवसीय संपाला स्थगिती दिली होती. संघटनेसोबत समाधानकारक चर्चा झाली नसल्याने आता पुन्हा चार दिवसीय संपाची हाक दिली आहे. या संपाची दखल घेतली नाही, तर १६ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि आयबीएने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.स्टेट बँक व स्टेट बँक समूहातील ५ सरकारी बँका, १८ राष्ट्रीयीकृत बँका, आयडीबीआय, कर्नाटक बँक, फेडरल बँक, १८ जुन्या खासगी बँका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, एचएसबीसी, सिटी बँक, ८ विदेशी बँकांमधील शाखा संपात सामील होणार असल्याचे विश्वास उटगी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
फेब्रुवारी अखेरीस पाच दिवस बँका बंद
By admin | Published: February 13, 2015 1:44 AM