पिंपरी : मतदार जनजागृतीसाठी शहरातील सर्व बँकांनी सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी केले.महापालिकेच्या निवडणुकीबाबत शनिवारी स्थायी समिती सभागृहात शहरातील बँकप्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आचारसंहिता कक्षाचे प्रमुख सुरेश जाधव, सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, अण्णा बोदडे, मुख्यलेखापाल दिलीप लांडे तसेच बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ महाराष्ट्र, सेवा विकास बँक, कॅनरा बँक, कॉसमॉस बँक, पिंपरी चिंचवड बँक, बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी बँक, ओरिएंटल बँक आॅफ कॉमस, आयडीबीआय बँक, पी.एन.बी बँक यांच्यासह ३० बँकेचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध शाखांमध्ये मतदान जनजागृतीचे फलक, फ्लेक्स लावावेत. एटीएम सेंटरवर मतदारांना आवाहन करणारे भीत्तिपत्रक लावावेत, असे सांगितले. एका प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यावयाचे असल्याने पालिकेच्यावतीने त्याविषयी माहिती देणारे पत्रके बँक खातेदारांना वितरण करण्यासाठी बँकांकडून सहकार्य करणार असल्याचे सांगितले. मतदान टक्केवारी वाढविण्यास व मतदार जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. माने यांनी केले. त्यांनी निवडणूक कालावधीत बँकांनी करावयाच्या कामाची माहिती दिली. प्रास्ताविक बोदडे यांनी केले. (प्रतिनिधी)
मतदार जनजागृतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा
By admin | Published: January 22, 2017 4:45 AM