नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्रीवर घातलेल्या बंदीचा फटका वाइन विक्रीलाही बसला असून, ही बंदी अशीच कायम राहिली तर कोट्यवधी लिटर उत्पादित वाइन मातीमोल ठरण्याची भीती आॅल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.सर्वाधिक नुकसान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे होणार असल्याने पाचशे मीटर बंदीतून वाइन विक्रीला सूट मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाइन उद्योगाला संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करावी, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिली. सध्याच्या हंगामात वाइन उत्पादकांनी शेतकऱ्यांशी करार करून ४० ते ६० रुपये किलो दराने द्राक्ष खरेदी करून वाइनचा सुमारे एक कोटी लिटर इतका साठा करून ठेवला आहे. वाइनची विक्रीच होणार नसेल तर या साठ्याचे काय करायचे, असा प्रश्न उभा आहे. राज्यात ८० वायनरी असून एकट्या नाशिक जिल्ह्यातील संख्या ४२ इतकी आहे व त्यासाठी चार हजार एकरवर वाइनच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. जर वाइनची विक्रीच होणार नसेल तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या द्राक्षांची खरेदी होणार नाही, पर्यायाने शेतकऱ्यांना बागा नष्ट कराव्या लागतील, असे असोसिएशनचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मद्यविक्री बंदीचा वाइन उद्योगाला फटका
By admin | Published: April 09, 2017 12:15 AM