ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे कारागृहात भातलागवडीस सुरुवात झाली असून यंदा कर्जत-७ या जातीच्या भाताची लागवड केली जात आहे. शनिवारपासून या कामास सुरुवात झाली असून गतवर्षीपेक्षा यंदा जास्त भात पिकवण्याचा मानस असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. पावसाळा आला की, सर्वत्र भातलागवड होत असताना ठाणे मध्यवर्ती कारागृहातही भातलागवडीला सुरुवात झाली आहे. बंदींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठाणे कारागृहात विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये शेती हादेखील एक उपक्रम आहे. बंदींमधील कृषिकौशल्य विकसित करण्यासाठी ‘कमी क्षेत्रात जास्त उत्पादन’ या तत्त्वावर ठाणे कारागृहात गेल्या १५ वर्षांपासून शेती केली जाते. सध्या पावसाळा असल्याने या दिवसांत भाताची लागवड केली जाते, तर इतर दिवसांत भाजीपाल्याची शेती केली जाते. यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश असतो. ठाणे कारागृहात १० एकर जमीन असून यापैकी पाच एकर जमिनीत भातशेती केली जात आहे. या वर्षी कर्जत-७ या जातीचा भात कारागृहात पिकवला जात आहे. हा भात कारागृहातील सर्व बंदींसाठीच वापरला जात असल्याचे कारागृहाचे कृषिसेवक सुरज सूर्यवंशी यांनी सांगितले. या कामात २३ बंदी गुंतले आहेत. शनिवारी एक एकर जागेत भातलागवड करण्यात आली. उर्वरित जागेत लागवड करण्यासाठी पुढील १५ ते २० दिवस लागणार आहे. सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत या वेळेत लागवड केली जात आहे. गतवर्षी ३५०० किलो भात पिकवण्यात आला होता. या वर्षी त्याहीपेक्षा अधिक पिकवला जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
ठाणे कारागृहातील बंदी रमले भातलागवडीत
By admin | Published: July 19, 2016 3:10 AM