मुंबई - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा राजकीय संघर्ष रंगलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र भावी मुख्यमंत्रिपदावरून बॅनरबाजी सुरू आहे. आधी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे तर आता खा. सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकत आहेत.
खा. सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले भलेमोठे बॅनर गुरुवारी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर झळकले. या बॅनरमुळे राष्ट्रवादीत नेतृत्वाची तीव्र स्पर्धा समोर आली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या बॅनरवरून मुंबई पोलिसांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा १६ फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्यानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर मुंबईत लावले होते.
या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता. जयंत पाटील यांच्या बॅनर पाठोपाठ विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकले होते. आता सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर आज प्रदेश कार्यालयासमोर लागला. या बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
वाद होण्याइतके आम्ही बाळबोध नाही - सुळेबारामती : मध्यंतरी जयंत पाटील यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले होते. अजित पवार यांचेही पोस्टर लागत असतात. आता माझे लावण्यात आले आहे. पोस्टरवरून आमच्यात वाद होईल, इतके आम्ही तिघे बाळबोध नाही. पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सर्वच भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा - फडणवीसभावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशी राष्ट्रवादीमध्ये पद्धत आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे कुणाला वाटले तरी होते का? राजकारणात काहीही होत असते. त्यामुळे सर्वच भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.