मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानं पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं म्हटलं आहे. यानंतर आता संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत.
संजय राऊत यांच्या भांडूप येथील घराबाहेर काही बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे (Deepmala Badhe) यांनी हे बॅनर लावले आहेत. "तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है" असा मजकूर लिहण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. ''राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले किंवा महाराष्ट्र जिंकला असं नाही. तुम्ही एक जागा जिंकली, पण या राज्याची सूत्र शिवसेनेकडे, उद्धव ठाकरेंकडेच असतील. फार घमंड करू नका, 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.' या बादशाहीला नख लावण्याची हिंम्मत अजून कोणाचीच नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता तोच धागा पकडत नगरसेविका दिपमाला बढे यांनी संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर लावले आहेत.
संजय राऊत यांनी "आज संपूर्ण देश अग्निवीर योजनेवर बोलतोय. सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणार आहेत. चार वर्षाचे कंत्राट, जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल. तुघलक होता, त्यानेही असा निर्णय कधी घेतला नव्हता. देशाचे रक्षण कोणी करायचे, हे ज्याला कळत नाही, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही" असंही म्हटलं होतं.
"मोदी सरकारच्या निर्णयामुळे आज देशात अराजकता निर्माण झाली आहे. तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला आहे. महाराष्ट्राही खदखदत आहेत, पण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात असल्यामुळे महाराष्ट्र शांत आहेत. ही सूत्र शिवसेनेकडे जोपर्यंत असेल, तोपर्यंत राज्य शांत राहणार. काहीजण राज्याला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला होता.