विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना ते स्वत:, पत्नी व वडिलांच्या आजारपणासाठी तब्बल ४३ लाख ७१ हजार ८३३ रुपयांची वैद्यकीय बिले शासनाकडून मंजूर झाली आहेत. जिल्ह्यातील अन्य सहा आमदारांना १३ लाख ६८ हजार ४५७ रुपयांची बिले मंजूर झाली आहेत. आमदार क्षीरसागर यांनी पाठविलेली, परंतु शासनाने प्रलंबित ठेवलेली बिले २२ लाख ५९ हजार २०१ रुपयांची आहेत. त्यांनी २७ फेब्रुवारी २०१४ ते १८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत (१०८६ दिवस) शासनाकडे एकूण ८२ लाख ८४ हजार ४५७ रुपयांच्या बिलांची मागणी केली आहे.
आमदारांच्या वैद्यकीय बिलांबाबत तक्रारी येत असल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले. म्हणून माहितीचा अधिकार वापरून ‘लोकमत’ने कोणत्या आमदाराने किती वैद्यकीय बिलांची मागणी केली व त्यांना प्रत्यक्षात किती मंजूर झाली, यासंबंधीची माहिती विधानमंडळाकडून मिळविली. क्षीरसागर यांची जिल्ह्यात सर्व आमदारांत जास्त बिले असल्याचे माहिती अधिकारांतून पुढे आले आहे.
१६ नोव्हेंबर २०११ पासून १ लाख व १६ मार्च २०१६ पासून तीन लाखांपर्यंतची वैद्यकीय खर्चाची देयके विधिमंडळ सदस्यांकडून परस्पर कोषागार कार्यालयास मंजुरीसाठी सादर केली जातात. म्हणजे कोणत्याच आमदारांच्या तीन लाखांपर्यंतच्या बिलांचा यामध्ये समावेश नाही. ३ लाखांवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीचे अधिकार सचिवालयास देण्यात आले आहेत. त्यातंर्गत दिलेल्या बिलांची ही अधिकृत माहिती विधानमंडळाचे अवर सचिव रंगनाथ खैरे यांनी ‘लोकमत’ला २५ मार्च २०१९ ला उपलब्ध करून दिली.
सामान्य माणूस आजारी पडल्यावर त्याची पै-पै साठी होणारी त्रेधातिरपीट आणि त्याच्या एका मतावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी यांच्यासाठी उपलब्ध असणारी वैद्यकीय सुविधा याचा विचार केल्यास त्यातील दरी किती भीषण आहे, हेच निदर्शनास येते.... यांची बिले मंजूरआ. प्रकाश आबिटकर यांच्या मातोश्री सुशीला आबिटकर : ६,३३,८१८आ. डॉ. सुजित मिणचेकर : ४,४८,७७५आ. सुरेश हाळवणकर : ९७,५६५आ. संध्यादेवी कुपेकर : ८७,५३४आ. हसन मुश्रीफ : ७४,९४१आ. उल्हास पाटील : २६,३२९
आमदार आबिटकर यांच्या आईचे बिल हे २०१४ मधील असून अन्य आमदारांची बिले १ फेब्रुवारी २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीतील न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून आरोग्य विमा योजनेतील वैद्यकीय देयके आहेत.