मुंबई : कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही काळ रुसलेली लालपरी दोन वर्षांनंतर सध्या सुसाट धावत आहे. श्रावणात भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी दर सोमवारी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गणेशोत्सवात आणि गणेशोत्सवाच्या सुटीमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ९ कोटी जणांनी एसटीने प्रवास केला असून ४५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला.
एसटी महामंडळाकडून श्रावण महिन्यात विशेष बस सोडण्यात आल्या. श्रावणात एसटी बस त्र्यंबकेश्वर व भीमाशंकरसाठी सोडण्यात आल्या. तसेच इतर दिवशी काही मोजक्या जादा गाड्या सोडल्या. भक्तांना श्रावण महिन्यात देवदर्शन करता यावे यासाठी सर्व प्रमुख देवदर्शनस्थळी विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. त्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘गणपती स्पेशल’ ३ हजार ४१४ बसद्वारे सुमारे १ लाख ५० हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.