मनीष दोंदे,
खर्डी- येथील दळखण चक्र भागात राहणारे मूर्तिकार रामभाऊ जाधव बुवा यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींवर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जातोय. यंदा त्यांच्या कारखान्यात बाजीरावाच्या वेशातील बाप्पाच्या मूर्तींना जास्त मागणी आहे. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन येथे शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्याही मूर्ती कमी बनवाव्या लागतात, असे रामभाऊ यांचा मोठा मुलगा अर्जुन याने सांगितले.या मूर्ती केवळ हाताने बनवत असल्याने त्यातील कलाकुसर देखणी व बघण्यासारखी असल्याने त्यांनी बनवलेल्या मूर्तींना खर्डी परिसराबरोबरच कसारा, शहापूर, डोळखांब, मुरबाड, वाडा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, तसेच चेंबूर (मुंबई) आदी ठिकाणांवरून मागणी असते. साधारण दोन महिने अगोदर पाहिजे असलेल्या मूर्तींचे फोटो आणि पाट येथील कारखान्यात दिले जातात. त्यात्या फोटोप्रमाणे बाप्पांची मूर्ती बनवली जाते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी रामभाऊंनी बाप्पाच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला आपल्या छोट्याशा घरात सुरु वात केली होती. त्यांची पत्नी त्यांना माती मळून देण्यासाठी मदत करीत असे. आता या कामात दोन्ही मुले मदत करतात. या कारखान्याच्याच आधारावर ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. अल्पसे शिक्षण झालेल्या रामभाऊंनी मुंबईत राहत असताना मूर्ती बनण्याची कला, कारखान्यात माती मळणे आदी कामे करत असताना आत्मसात केली. त्यासाठी कुठेही शिक्षण घेतले नाही. मात्र, जिद्द आणि उपजत असलेल्या कलेमुळे या क्षेत्राकडे वळले. आज आपण मुंबई येथील मंत्रालयाशेजारील असणाऱ्या आमदार निवासावर जे राजमुद्रा असलेले चिन्ह पाहतो, ते रामभाऊंनी बनवलेले आहे.या कामात आता खूपच बदल झाले आहेत. मूर्ती बनवण्याचा खर्चसुद्धा खूपच वाढला आहे. यासाठी लागणारी माती गुजरातमधील भावनगर येथून आणावी लागते. तेथून आणण्यासाठी वाहतूक खर्च जास्त लागत असल्याने कल्याणातील एका व्यापाऱ्याकडून ती खरेदी केली जाते. पूर्वी ३५ किलोच्या एका गोणीला ३० रु पये लागत. मात्र, आता त्याच गोणीला साडेपाचशे रु पये मोजावे लागतात. रंगांचेही भाव गगनाला भिडले आहेत. केवळ आपली कला पुढच्या पिढीने पुढे जोपासावी व बाप्पाची सेवा करावी, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कारखाना सुरू ठेवल्याचे रामभाऊंनी सांगितले.