मुंबई : पूर्वी दिवाळी, दसरा, गणेशोत्सव केवळ साजरे करण्यासाठी सर्व एकत्र जमायचे. आता मात्र याचे स्वरूप पालटले असून सोशल मीडियाच्या व्यासपीठामुळे वेगळा टच लाभला आहे. सप्टेंबरमध्ये विराजमान होणाऱ्या बाप्पाची चाहूल नेटिझन्सना लागली असून मोठमोठ्या मंडळांचे टीझर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.पाद्यपूजन, पाटपूजन, आगमन सोहळे अशा एका ना अनेक सोहळ्यांविषयी माहिती देताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व्हिडीओचा वापर केला आहे. या माध्यमातून यंदाच्या वर्षीचे वेगळेपण मांडले आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा यांच्या आगमनाची चाहूल देणारे काही सेकंद अथवा मिनिटांचे टीझर्स तरुणांनी बनविले आहेत.विशेष म्हणजे या टीझर्सना सोशल मीडियावर पसंती मिळत असून मोठ्या संख्येने शेअरिंगही होते आहे. सणापेक्षा काहीसे स्पर्धेचे स्वरूप आलेल्या सण, उत्सवांचे मूळ उद्देश परतण्यासाठीही याच व्यासपीठाचा वापर व्हावा, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
सोशल मीडियाला बाप्पाची चाहूल!
By admin | Published: June 21, 2016 2:39 AM