- अनिल गवई / ऑनलाइन लोकमत -
खामगाव (बुलडाणा), दि. 3 - सुखकर्ता... दु:खहर्ता... गणनायक अशी अनेक गणरायाची रूपं आपल्याला बघायला मिळतात. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवानिमित्त अवघ्या ४१ ग्रॅम वजनाची कागदी गणेशमुर्ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.
गणेशोत्सव हा अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची मुर्ती ठरवण्याची लगबग सुरू असतानाच बाजारात अतिशय कमी वजनाचे बाप्पा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मोठ्या मुर्तीला महत्व दिले जात असले तरी या मुर्ती वजनदार असल्याने उचलताना मुर्ती क्षतीग्रस्त होवू शकते. त्यामुळे काही दिवसांपासून पर्यावरणपुरक आणि आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने माती आणि शाळु मातीसोबतच पाण्यात सहज विरघळणाºया गणेशमुर्तींची मागणी वाढली आहे. या पार्श्वभुमीवर शहरात चक्क कागदी परंतु आकर्षक गणेशमुर्ती विक्रीस आल्या. यापैकी कागदाच्या ओल्या लगद्यापासून तयार झालेली आकर्षक गणेशमुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
इतर मुर्तींच्या तुलनेत दुप्पट महाग !
सर्वसाधारण गणेशमुर्तींच्या तुलनेत कागदी गणेशमुर्ती ह्या दुप्पटीने महाग ठरत आहे. मात्र आकर्षक आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे या गणेशमुर्ती घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणपूरक गणेशमुर्तींची मागणी वाढली आहे. मातीच्या गणपतीसोबत आता आकर्षक कागदी गणेशमुर्तींनाही मागणी होत आहे.
- रेणुका वरणगावकर, पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विक्रेता खामगाव.