पेण : आगामी गणेशोत्सवाची तयारी पेणमध्ये आत्तापासूनच जोरदार सुरू झाली. गणेशमूती बनविण्याचे काम सुरू झाले असून बाप्पा सेलिब्रेटींच्या रूपात अवतरले आहेत. बाजीराव मस्तानी चित्रपट पिंगा या गाण्याने गाजला, तसाच ती क्रेझ कलासंगमाच्या प्लॅटफॉर्मवर अवतरली आहे. या बाजीराव स्वरूपातील बाप्पाला परदेशातही मागणी असल्याचे कलाकारांनी सांगितले.राव तथा बाजीराव वेशातील बाप्पाचे मॉडेल बाप्पांच्या निर्मात्यांनी पेश केले असून या ‘राव’ रूपातील पेशवाई पगडीधारी बाप्पा आता आपल्या ‘पराक्रमाने’ गणेशभक्तांचे विघ्न दूर करण्यास या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. बाजीरावची वेशभूषा डोक्यावर पेशवाई पगडी, कपाळावर चंद्रकोर, कुकुयतिलका बरोबरीने भस्मचर्चित गौरवर्णीय ही गणेशमूर्ती भक्तगणांना निश्चितच नेत्रसुखद दर्शन देणार आहे. प्रारंभालाच २०० गणेशमूर्तींची मागणी परदेशस्थ गणेशभक्तांनी नोंदविल्याने ‘राव’ रुपड्यातील सेलिब्रेटी बाप्पा यावर्षीचे आकर्षण ठरणार आहे.हमरापूर - गोहे कलाग्राम नगरीसह पेणच्या दीपक कला केंद्रानेही नवीन गणेशमूर्तीचे मॉडेल्स २ फुटी आकारात बैठी साकारली आहे. पांढऱ्या शुभ्र पेशवाई झब्ब्यात तसेच लाल किरमिरी झबल्यातील गौरवर्णीय गणेशमूर्तीची ठेवण मोहक आहे. पुढील काळात यथावकाश घोड्यावर स्वार झालेला बाजीराव पेशवाही साकारून त्याला बाप्पांचे प्रतिरूप देण्यास मूर्तिकारांची सज्जता झाले आहेत. कलेच्या प्रांगणातील विविध रूपे साकारण्यात पेणच्या मूर्तिकलेचा हातखंडा आहे. देवाला कोणत्याही वेशभूषेत सादरीकरण करा, गणेशभक्तांच्या हौसेला मोल नसतं, ही खूणगाठ लक्षात घेऊन मूर्तीचा खप वाढविण्याकडेच राजा व बाहुबली या रूपातील गणेशमूर्तींच्या मॉडेल्स भलत्याच लोकप्रिय ठरल्या होत्या. चित्रपट व मालिका यामधून मूर्तिकारांना कलेचे संदर्भ मिळतात. सध्या पेणच्या मूर्तिकलेत पदवीधर शिक्षणाने परिपूर्ण झालेली नवी पिढीच कार्यरत असल्याने नवनवीन शक्कल लढवून गणेशमूती तयार करीत आहेत. (वार्ताहर )
बाजीरावाच्या रूपात अवतरणार बाप्पा!
By admin | Published: April 28, 2016 2:38 AM