रसगुल्ला शब्द जरी उच्चारला तरी खवैय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मूळचा बंगाली रसगुल्ला आता संपूर्ण जगाचा लाडका झाला आहे. कमी पदार्थांमध्ये आणि चटकन होणार हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांनाही भुरळ घालतो हे विशेष !
साहित्य :
गायीचे दूध एक लिटर
सफेद व्हिनेगर दोन लहान चमचे (टी स्पून)
साखर एक किलो
मैदा अर्धी वाटी
गुलाब पाणी चवीपुरते
पाणी
बारीक पिस्ता काप, बदाम काप सजावटीसाठी
कृती :
- गायीचे दूध उकळवून घ्या. दूध उकळल्यावर गॅस सुरु असतानाच त्यात दोन चमचे व्हिनेगर घाला.
- व्हिनेगरमुळे फाटलेले दूध गाळून सुती, मलमलच्या कापडात बांधून ठेवा. या गोळ्यातून संपूर्ण पाणी निथळून घ्या.
- पाणी निथळलेले मिश्रण परातीत घेऊन त्यात अर्धी वाटी मैदा घाला.हे सर्व मिश्रण भरपूर मळून एकजीव करा.
- एकजीव मिश्रणाचे छोट्या सुपारीसारखे मात्र लांबट आकाराचे गोळे करून घ्या.
- दुसरीकडे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी घेऊन त्यात साखर घाला. साखर विरघळल्यावर गॅस बंद करा. त्यात तयार केलेले गोळे टाका आणि चमच्याच्या साहाय्याने दोन वेळा हळुवारपणे ढवळा. आणि पूर्ण थंड करा.
- मिश्रण गार झाल्यावर त्यात काही थेंब गुलाबपाणी टाकून रसगुल्ले सर्व्ह करा.सर्व्ह करताना आवडत असल्यास त्यावर बारीक चिरलेले पिस्त्याचे आणि बदामाचे काप घालावेत.