मुंबई, दि. 21 - गणेशोत्सवापूर्वी मुलुंडमधील कोकणे आणि सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लाडक्या बाप्पाच्या जल्लोषात आगमन व्हावं यासाठी सजावटीचे काम पाहून घरी परतणा-या चेतन कोकणे (33 वर्ष) व सुशांत सावंत (30 वर्ष) यांच्यावर काळानं घाला घातला आहे. रविवारी रात्री उशीरा या दोघांचाही अपघाती मृत्यू झाला. विक्रोळीतील काकांकडे दिलेल्या मखर सजावटीचे काम पाहून चेतन कोकणे (33 वर्ष) व मित्र सुशांत सावंत (30 वर्ष)सोबत घरी परतत असताना त्यांच्या बाईकचा अपघात झाला. रविवारी (20ऑगस्ट) रात्री ही घटना घडली आहे. बाप्पाच्या या भक्तांवर काळानं घाला घातला. ऐन उत्सवाच्या काळा कोकणे व सावंत कुटुंबीयांत दुःख पसरले आहे.
मुलुंडमधील म्हाडा वसाहतीत चेतन कोकणे आई, पत्नी आणि 5 वर्षाच्या मुलासोबत राहत होता. चेतन शेअर मार्केटमध्ये तर सुशांत व्हिडीओ एडिटर म्हणून काम करत होता. चेतनच्या घरी जवळपास 40 ते 50 वर्षापासून गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. वडिलांच्या निधानानंतर चेतननेही परंपरा कायम ठेवली. रविवारी टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सासूला भेटून तो मित्र सुशांतसोबत विक्रोळीतील काकांकडे मखर सजावटीचे काम पाहून घरी परतत होता. रात्री उशीरा 1 वाजण्याच्या सुमारास चेतन व सुशांत विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरुन घराकडे येण्यास निघाले.
त्यावेळी टी-जंक्शनकडे वळण घेत असताना त्यांची बाईक दुभाजकावर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. चेतनने हेल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रात्री 1.45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून अपघाताची माहिती मिळताच सावंत आणि कोकणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.दरम्यान याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.