ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १६ : 'पुढल्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला गुरूवारी मोठ्या जल्लोष्षात निरोप देण्यात आला. पण भक्ताच्या या आनंदाला गालबोट लागलं आणि राज्यभरात गणपती विसर्जनादरम्यान एकूण १५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. त्यामध्ये मालेगावमध्ये २, वर्ध्यात ३, सिन्नर ३, पुणे-३, नांदेड-३, त्र्यंबकेश्वर १, नाशिक १ अकोला १ अशाप्रकारे राज्यात एकूण १५ जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७ जणांचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सिन्नरमध्ये तिन जण बुडाले, तर घरी आलेल्या आसामच्या जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संदीप शिरसाठ असे या आसाम रायफल्सचा जवानाचं नाव असून एका बुडणाऱ्या युवकाला वाचविताना शिरसाठ यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. पिंपळदमध्ये एकाचा, मालेगावमध्ये एकाचा तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. आणखी एका घटनेत गंगापूर रोड बेंडकुले मळा येथे चौघे जण गोदावरीत बुडाले. यापैकी तिघांना वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले. पण या घटनेत एका १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सिन्नर - रामेश्वर शिवाजी सिरसाट (३१), संदीप आणा सिरसाट (२५), वाडीवऱ्हे - निलेश साईनाथ पाटील (२५, डिजिपी नगर, नाशिक), त्रंबकेश्वर - भूषण हरी कसबे (१७), मालेगाव (दाभाडी) - सुमित कांतीलाल पवार (१४), पिंपळद - अमोल साहेबराव पाटील, नाशिक (गंगापूर) - रोशन रतन साळवे (बेंडकुळे मळा, गंगापूर रोड) अशी बुडालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अमरावतीत गणेश विसर्जनादरम्यान विद्यार्थी बुडाला वरुड (अमरावती) कुटुंबासह बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी गेलेला विद्यार्थी गणरायाचे विसर्जन करताना पाय घसरून शेंदूरजनाघाट तालुक्यातील नागठाणा प्रकल्प २ मध्ये बुडाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान घडली. घटनास्थळावर पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. अंकुश दीपक उईके (१६, रा. शेंदूरजनाघाट) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो आपल्या आई- वडिलांसह घरच्या गणेश विसर्जनासाठी येथे आला होता. विद्यार्थी बुडत असताना एका युवकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तो विद्यार्थी बुडाला होता. शेंदूरजनाघाटचे ठाणेदार एस एन नितनवरे विद्यार्थ्याचा शोध घेत आहे. तर तहसीलदार आतिष बिजवल यांनी घटनास्थळी भेट दिली.
विसर्जन करताना पुणेत धायरी फाटा येथे विसर्जनासाठी गेलेल्या एका युवक बुडाला. तर दुसऱ्या एका घटणेत चाकण येथील जितेंद्र किसन धनगर हा तरूण भामा नदीत बुडाला. हि घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली असून दोन्ही तरुणांचे मृतदेह मिळाले नाही. चाकण येथील मार्केट यार्ड जवळ तो राहत होता. नदीकिनारी चाकण पोलीस, महसूल प्रशासनातील तलाठी, मंडल अधिकारी, इतर अधिकारी व पथक त्याचा शोध घेत आहेत.
नागपूरात महाप्रसादात वाद, युवतीचा मृत्यू महाप्रसाद प्रसंगी शुल्लक कारणावरून झालेल्या वादात धक्का लागल्याने एका युवतीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सदर छावनी येथे घडली. मनीषा किशोर मसराम (२७) असे मृताचे नाव आहे. छावनी येथील हनुमान मंदिराच्या बाल गोपाल गणेशोत्सव मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त बुधवारी रात्री महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. महाप्रसाद करण्याच्या जागेवरून मनीषाचा भाऊ लोकेश (३०) याचे वस्तीतील दर्शन नावाच्या युवकासोबत भांडण झाले. दोघेही एकमेकांशी वाद घालू लागले. लोकेशची बहिण मनीषा भांडण सोडविण्यासाठी मध्ये आली. दरम्यान दर्शनचा मनीषाला धक्का लागला. ती रस्त्यावर जाऊन पडली आणि बेशुद्ध झाली. कुटुंबियांनी तिला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
वर्ध्यात विसर्जन करताना सेल्फी जीवावर बेतलीआष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला. अशातच तोल जावून चारजण पाण्यात बुडाले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा वाचविण्यात यश आले. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.हंसराज रमेश सोमकुंवर (२६), केवल सुरेश मसराम (२०) व चेतन गेंदराज नेहारे (१९) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेने माणिकवाडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतून पंकज खवशी हा सुदैवाने बचावला. तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
अकोला येथे तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या थार येथील ३० वर्षीय युवकाचा गणेश विसर्जन करताना बुडाल्याने मृत्यू झाला. थार येथील प्रदीप फोकमारे हे संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील वान नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. नदीत गणेश विसर्जन करताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेथे उपस्थित लोकांच्या निदर्शनात येताच त्यांनी प्रदीप फोकमारे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. बुडाल्याने प्रदीप फोकमारे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व आप्त परिवार आहे.नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे श्री विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 33 वर्षीय तरुणाचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू.