नागपूर : मोदी सरकारच्या अमेरिकनधार्जिण्या धोरणाचा निषेध म्हणून देशातील सर्व डावे पक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याला विरोध करणार असून, येत्या २४ जानेवारीला दिल्लीसह देशभर ‘ओबामा चले जाओ’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य खा़ डी.राजा यांनी शुक्रवारी नागपुरात लोकमतशी बोलताना दिली़ भाकपाच्या राष्ट्रीय समितीची तीन दिवसीय बैठक शुक्रवारपासून नागपुरात सुरू झाली. राजा म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अमेरिकाधार्जिणे धोरण राबविण्यावर भर दिला जात आहे. विमा, कोळसा आणि संरक्षण क्षेत्रासह इतरही क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी हा त्यातलाच प्रकार असून, आगामी काळात याचे दुरागामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. देशवासीयांना ही बाब कळावी यासाठी २४ जानेवारीला म्हणजे ओबामा यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी संपूर्ण भारतभर आंदोलन केले जाईल. त्यात देशातील सहा डावे पक्ष सहभागी होतील, असे राजा म्हणाले.
बराक ओबामांविरुद्ध डाव्यांचे ‘चले जाओ’!
By admin | Published: January 17, 2015 3:16 AM