यदु जोशी, नागपूरराज्यातील परवानाधारक सावकारांसाठी लागू असलेली कार्यक्षेत्राची हद्दबंदी अंशत: उठविण्यात आली असून त्यामुळे हद्दीबाहेर कर्जपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार सावकाराला त्याच्या परवान्यामध्ये निश्चित केलेल्या क्षेत्रामध्येच कर्जवाटप करता येते. सावकारांकडील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने १० एप्रिल २०१५ रोजी लागू केला होता. सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गतसावकाराच्या कर्जाची रक्कम राज्य शासन भरते. मात्र राज्यात अनेक सावकारांनी त्यांना ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे.सावकारांसाठी हद्दबंदी लागू असल्याने हद्दीबाहेरील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळत नव्हता. आता नव्या निर्णयानुसार मिळू शकतो. उदाहरणच द्यायचे तर यवतमाळ जिल्ह्णातील वणी तालुक्यातील सावकाराने त्याच्या हद्दीबाहेर पांढरकवडा तालुक्यात दिलेले कर्ज आता माफ होईल. मात्र, त्या सावकाराने त्याच्या जिल्ह्णाबाहेर कर्ज दिले असेल ते माफ होणार नाही. या निर्णयासाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात विधेयक आणून सावकारी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. ही सुधारणा १६ जानेवारी २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे. काही लोकप्रतिनिधी आणि अमरावती, जालना, वर्धा व यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सावकाराच्या क्षेत्राबाहेरील सावकारांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली होती.
सावकार हद्दबंदी उठली!
By admin | Published: December 14, 2015 2:28 AM