बारामती : वळवाच्या पावसानंतरदेखील बारामती शहरात वाढते तापमान कायम आहे. मंगळवारी (दि. १७) शहरात ४२ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याचे माळेगाव येथील कृषिविज्ञान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले, तर इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर १७ ते २१ मेदरम्यान राज्यात उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामध्ये नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, हलके, पातळ, सुती कपडे घालावेत, घरातून बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट, चपलांचा वापर करावा. घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबूपाणी, ताक या पेय पदार्थांचे आवश्यकतेप्रमाणे सेवन करावे. पाळीव प्राण्यांना, गुरांना छावणीत ठेवावे. त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. गर्भवती महिला, आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पहाटेच्या वेळी अधिक कामाचा निपटारा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, काय करू नये, याबाबत स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)काय करणे टाळावेशिळे अन्न खाऊ नये, उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, चहा, कॉफी, मद्य, काबोर्नेटेड थंड पेय यांचे सेवन टाळावे, दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बारामती ४२, भवानीनगरमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमान
By admin | Published: May 18, 2016 1:12 AM