Baramati Assembly Constituency : बारामती लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. लोकसभेला अजित पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. युगेंद्र पवार यांच्या पाठीशी शरद पवार हेसुद्धा ठामपणे उभे आहेत. त्यामुळे ही लढाई अटीतटीची होणार आहे. अशातच आता मलाच आता या बारामतीचे सगळं बघावं लागणार असल्याचे विधान अजित पवार यांनी केलं आहे.
बारामती मतदारसंघातल्या लोणी आणि कडेपाठार येथे अजित पवार यांनी आज सभा घेतली. या सभांमधून पुन्हा एकदा काका पुतण्या वादाचा नवा अंक पाहायला मिळाला आहे. शरद पवार रिटायर झाल्यानंतर बारामती मीच बघणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही बोचरी टीका केली आहे.
"परवा मी साहेबांचे भाषण ऐकले साहेबांनी काही गावांना भेटी दिल्या त्यावेळेस ते म्हणाले की अजून दीड वर्षांनी मी थांबणार आहे आणि इतरांनी सगळं बघायचं. साहेब रिटायर झाल्यानंतर दीड वर्षांनी तुमच्याकडे कोण बघू शकतं. ही माझी हुशारकी म्हणून नाही. पण दुसरा नवखा बघू शकतो का. त्याला याच्यातले काही माहिती आहे का. तो शिकेल नाही असे नाही. आम्ही देखील आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही. काही वर्ष काम करावं लागतं लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. आम्ही पण साहेबांच्याच विचाराने पुढे जाणार आहोत. मी कुठे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे," असं अजित पवार म्हणाले.
"माझी आपल्याला विनंती आहे की मलाच आता या बारामतीचे सगळं बघावं लागणार आहे. कारण सगळ्यांच्या वयाचा विचार करता. सुप्रियाच्या वेळेस सुद्धा सांगायचे की ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही सुप्रियांकडे लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे त्यामुळे नातवाकडे लक्ष द्या असं सांगितलं जात आहे. आता हे तर कठीणच झालं. पोरगा सोडला आणि नातूच पुढे केला. मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेले आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.
"मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करत आहे. मी साडेसहा लाख कोटींचा अर्थसंकल्प सांभाळत आहे. त्याच्यामध्ये त्याला म्हणावं साडेसहा लाख कोटी मध्ये टिंब काढून दाखव. तो माझा पुतण्याच आहे त्यामुळे टीका करणे योग्य नाही," असेही अजित पवार म्हणाले.